राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
प्रस्तावना
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण केंद्रांतर्गत समावेश असलेल्या पैकी राज्यात डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या हिवताप, हत्तीरोग, डेंगीताप, जॅपनिज एन्सेफेलायटिस, चिकनगुनीया व सॅन्डफलाय मार्फत प्रसारित होणारा चंडीपूरा तसेच पिसवांमार्फत प्रसारित होणाऱ्या प्लेग या रोगांच्या नियंत्रणासाठी शासन स्तरावरुन उपाययोजना राबविण्यात येतात.
सन १९५३ पासून राज्यात हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील प्रमुख टप्पे खालीलप्रमाणे.
१९५३ -राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम
१९५८ -राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम
१९७७ -सुधारीत योजना
१९७९ -बहुउद्देशिय आरोग्य सेवा
१९९५ -हिवताप कृती योजना १९९५ नुसार हिवताप विरोधी उपाय योजनांचीअंमलबजावणी
१९९७ -जागतिक बॅंक अर्थ सहाय्यित हिवताप नियंत्रण प्रकल्पाची१६ आदिवासी
जिल्हयांमध्ये अंमलबजावणी.
१९९९ -राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रम
२००४ -राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
२०२१ -राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण केंद्र
कार्यक्रमाचे उद्दिष्ट :
महाराष्ट्र राज्यात १९५३ ते १९५८ या कालावधीत राष्ट्रीय हिवताप नियंत्रण योजना (छडब्च्) कार्यान्वित होती. त्यानंतर १९५८ मध्ये योजनेचे राष्ट्रीय हिवताप निर्मूलन योजनेत (छडम्च्) रुपांतर झाले. परंतु १९६५ नंतरचे काळात राज्यातील हिवतापाचे प्रमाणात वाढ झाल्याने १९७७ पासून राज्यात हिवतापाच्या सुधारित योजनेची (डच्व्) अमंलबजावणी सुरु झाली.२००४ पासुन सर्व किटकजन्य रोग हे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या एकाच छताखाली घेतलेले आहे.सन २०२१ पासून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण केंद्र या कार्यक्रम नावाने कार्यान्वीत आहे.
सुधारित योजनेची उद्दिष्टे :
- किटकजन्य आजारांच्या रुग्णांचे प्रमाण कमी करणे.
- किटकजन्य आजारांने होणारे मृत्यू टाळणे.
- औद्योगिक व शेतकी कार्यावर हिवतापाचा परिणाम होवू न देणे.
- आतापर्यंत मिळविलेले यश टिकविणे.
- लवकर निदान व पूर्ण कालावधीचा उपचार
- प्रसार साखळी खंडित करणे.
- नैर्सगिक,जीवशास्त्रीय व रासायनिक पध्दतीने किटकजन्य रोगांवर नियंत्रण करणे.
वरील योजनेमुळे १९८६ पर्यंत हिवताप रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. तथापि, त्यानंतर पुन्हा हिवताप रुग्णांचे तसेच त्यामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढतच राहीले. ही वाढ केवळ महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशातील इतर राज्यातही निदर्शनास आल्याने केंद्र शासनामार्फत डिसेंबर १९९४ मध्ये एक तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली. विविध राज्यातील अतिसंवेदनशील विभाग निवडून तेथे राबविण्यासाठी विशेष उपाययोजना या समितीमार्फत सूचविण्यात आल्या. या तज्ञ समितीच्या शिफारशींनुसार सध्या हिवताप कृती कार्यक्रम १९९५ (डाच् १९९५)मधील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात सध्या हिवताप विरोध कार्यक्रमाची अंमलजबावणी करण्यात येते. एप्रिल १९९९ पासून योजनेचे राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध योजनेत (छाडच्) रुपांतर करण्यात आले. केंद्रशासनाच्या आदेश क्र.ज्ण्१४०२०ध्७१ध्२००३.डंसए दि.२ डिसेंबर २००३ नुसार सन २००४ पासून किटकांमार्फत प्रसार होणारे हिवताप, हत्तीरोग, डेंगी, जे.ई. व काला आजार तसेच चिकुनगुनिया (सन २००६ पासुन महाराष्ट्रात रुग्ण आढळण्यास सुरवात झाली) या कार्यक्रमासाठीचे प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपक्रम हे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत (छटठक्ब्च्) एकत्रित राबविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टे
- हिवताप, डेंगीताप, जे.ई. ने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे व रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणे.
- सन २०३० पर्यंत हिवताप दुरिकरण कार्यक्रम टप्प्याटप्प्याने अंमलात आणणे.
- सन २०२७ पर्यंत हत्तीरोग दुरिकरण कार्यक्रम अंमलात आणणे.
- हिवताप:
हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतुपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती प्रामुख्याने आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून त्यामुळे मेंदूचा हिवताप होवून रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दुषित अनॅाफेलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो.
- सन २०२२ पासून राज्याची वर्षनिहाय हिवताप परिस्थिती:
वर्ष | हिवताप रुग्ण | पी.एफ. रुग्ण | हिवतापाने मृत्यू | पी.एफ. % |
2022 | 15451 | 8983 | 26 | 58.15 |
2023 | 16159 | 6297 | 19 | 38.93 |
2024 | 21078 | 8832 | 26 | 41.89 |
2025
(14 एप्रिल पर्यंत) |
2400 | 961 | 0 | 40.04 |
- डेंगी ताप
डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. सदर रोगाचा प्रसार डेंग्यू विषाणु दुषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला हा डेंग्यू विषाणू दुषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसात डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू तापाचे ३ प्रकार आहेत. १) डेंग्यू ताप २) रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप ३) डेंग्यू शॉक सिंड्रोम. डेंग्यू ताप हा फल्यू सारखा आजार आहे. रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिड्रोंम हा तीव्र प्रकारचा रोग आहे यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते.
- सन २०२२ पासून राज्याची वर्षनिहाय डेंगी परिस्थिती:
वर्ष | तपासलेले रक्तजल नमुने | डेंगी विषाणू युक्त | मृत्यू |
2022 | 85961 | 8578 | 27 |
2023 | 134108 | 19034 | 55 |
2024 | 152397 | 19385 | 40 |
2025(१४ एप्रिल पर्यंत) | 21096 | 1273 | 0 |
- चिकुनगुन्या
चिकुनगुन्या विषाणुचा प्रसार एडीस एजिप्टाय या डासांपासून होतो. या विषाणू तापाची लक्षणे- ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, अंगावर चट्टे उमटणे व सांध्यातून हाडे वळणे इत्यादी आहेत.
- सन २०२२ पासून चिकुनगुन्या तापाबाबतची सद्यस्थिती:
वर्ष | तपासलेले रक्तजल नमुने | चिकुनगुन्या विषाणू युक्त | मृत्यू |
2022 | 14758 | 1087 | 0 |
2023 | 30892 | 1702 | 0 |
2024 | 57453 | 5854 | 0 |
2025(१४ एप्रिल पर्यंत) | 9981 | 616 | 0 |
- जे.ई (मेंदुज्वर)/ ए.ई.एस./चंदिपुरा/झिका:
सन २०२२ पासून ए.ई.एस./जे.ई/चंदिपुरा/झिका रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे
वर्ष | जे. ई. | चंडीपुरा | ए.ई.स. | झिका. | ||||
रुग्ण | मृत्यू | रुग्ण | मृत्यू | रुग्ण | मृत्यू | रुग्ण | मृत्यू | |
2022 | 2 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 3 | 0 |
2023 | 5 | 0 | 0 | 0 | 1 | 1 | 18 | 0 |
2024 | 4 | 2 | 0 | 0 | 1 | 1 | 140 | 0 |
2025 (१४ एप्रिल पर्यंत) | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 |
0 |
0 |
- हत्तीरोग :
अ) राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम –
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यात १९५७ पासुन सुरु झाला. राज्यातील १८ जिल्हे हत्तीरोग प्रभावित आहेत. जिल्हे-चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, नंदरूबार, सोलापूर, अकोला, जळगांव, ठाणे व पालघर. हत्तीरोग हा आजार वुचेरेरिया बॅनक्रॉफ्टी व ब्रूगियामलायी नावाच्या परजीवीमुळे होतो. हा परजीवी क्युलेक्स डास चावल्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करतो.
ब) हत्तीरोग लक्षणे –
या आजारात सुरुवातीच्या काळात ताप व अंगदुखी आढळते. हत्तीरोगाचे परजीवी लसिका वाहिन्या व ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण करतात, त्यामुळे काही वर्षांनंतर रुग्णांच्या हाता-पायावर सुज येते तसेच पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सुज येते. या आजारामुळे रुग्णाचा मृत्यु होत नाही तथापि पायाला/ अंडाशयाला प्रचंड सुज आल्याने त्याचे सामाजिक, भावनिक आणि आर्थिक जीवन धोक्यात येते.
क) हत्तीरोग-प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना –
१) हत्तीरोग सर्वेक्षण- दरवर्षी दिनांक १६ ते ३१ ऑगष्ट या कालावधीत राज्यातील हत्तीपाय आणि अंडाशयवृध्दी (हायड्रोसील) असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. राज्यात सन २०२२ पासून हत्तीरोग रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
वर्ष | हत्तीपाय रुग्णांची संख्या | अंडाशयवृध्दी रुग्णांची संख्या | एकूण |
16 ते 31 ऑगस्ट 2022 | 30334 | 7256 | 37590 |
16 ते 31 ऑगस्ट 2023 | 30894 | 5229 | 36123 |
16 ते 31 ऑगस्ट 2024 | 28475 | 2879 | 31354 |
२) हत्तीरोग बाधित रुग्णांना उपचार- मागील ३ वर्षातील हत्तीरोग सर्व्हेक्षणासाठी तपासणी केलेल्या रक्तनमूने आणि नव्याने हत्तीरोग दूषित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
वर्ष | तपासणी केलेले रक्तनमूने | हत्तीरोग दुषित रुग्ण संख्या |
2022 | 1175640 | 563 |
2023 | 1135933 | 375 |
2024 | 1278090 | 324 |
2025(फेब्रुवारी अखेर) | 109325 | 25 |
3) अंडाशयवृध्दी (हायड्रोसील) झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया-
हत्तीरोगामुळे अंडाशयवृध्दी (हायड्रोसील) झालेल्या रुग्णांना शोधून त्यांची हायड्रोसील शस्त्रक्रिया करण्यात येते. राज्यातील सन २०२ पासून शस्त्रक्रिया विषयक आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
वर्ष | हायड्रोसील शस्त्रक्रिया संख्या |
2022 | 3282 |
2023 | 3298 |
2024 | 2084 |
2025 (फेब्रुवारी अखेर) | 459 |
- प्लेग नियंत्रण कार्यक्रम
राज्यात बीड जिल्हयातील मामला गावामध्ये ऑगस्ट/सप्टेंबर १९९४ मध्ये संशयित प्लेग उद्रेक आढळला होता. त्या काळात राज्यातील २१ जिल्हयात एकूण ६३४ रुग्णांचे रक्तजल नमुने प्लेगसाठी दिषत आढळले होते. म्हणून ३ ऑक्टोबर १९९४ मध्ये प्लेग नियंंत्रण पथक पुनःश्च स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकाचे मुख्यालय पुणे असून ते सहसंचालक, आरोग्य सेवा, (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग),पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे
सन १९९४ पासून प्लेग पथकाकडून बीड जिल्हयातील मामला व जवळपासच्या परिसरात प्लेगसाठी नियमितपणे सर्वेक्षण करण्यांत येते, याशिवाय, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर व पुणे या जिल्हयांतील सन १९९४ मधिल प्लेग समस्याग्रस्त गावात तसेच पिसवांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी आलेल्या, राज्यातील इतर जिल्हयातही प्लेग संदर्भात सर्वेक्षण करण्यात येते.
- किटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना :
१). हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना:
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अधिन राहून राज्यामध्ये राबविण्यात येणा-या विविध हिवताप विरोधी उपाययोजना खालीलप्रमाणे-
(अ) सर्वेक्षण –
- नवीन हिवताप रुग्ण शाधण्यासाठी राज्यातील सर्व पाडा, वाडया, वस्ती, गावपातळीवर कर्मचा-यांमार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण.
- आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत किटकशास्त्रीय सर्वेक्षण
- “आशा” स्वयंसेवक स्थानिक स्तरावर किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग.
(ब) प्रयोगशाळा –
- राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रा.आ. केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध. बिगर आदिवासी क्षेत्रात २ ते ३ प्रा. आ. केंद्रासाठी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध.
- जिल्हा व ग्रामिण रुग्णालय स्तरावरही प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध.
- नविन पदाच्या आढाव्यामध्ये प्रत्येक प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मंजुर.
- दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाच्या तात्काळ निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टीक टेस्ट किटचा पुरवठा.
- पी.फॅल्सीफेरम या गंभीर स्वरुपाच्या हिवतापाचे शीघ्र निदान व उपचारासाठी “आशा” कार्यकर्तीना प्रशिक्षण.
(क) डास नियंत्रणासाठी उपाययोजना :
- किटकनाशक फवारणी :-
राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गांवामध्ये सिंथेटिक प्रायारेथ्राईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्यात येते.
वर्ष | फवारलेली लोकसंख्या (%) |
2022 | 97.51 |
2023 | 96.०० |
2024 | 96.26 |
2025 | – |
- अळीनाशक फवारणी :
नागरी हिवताप योजनेंतर्गत राज्यातील निवडक १५ शहरांमध्ये (मुंबईसह) तसेच १७ हत्तीरोग नियंत्रण पथकामार्पुत डासोत्पत्तीस्थांनांवर टेमिफॉस, बी.टी.आय. या अळीनाशकांची फवारणी करण्यात येते. राज्यात नागरी हिवताप योजनेत समाविष्ट असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे व मुंबई.
- जीवशास्त्रीय उपाययोजना :
किटकनाशकांमुळे होणा-या प्रदूषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्तीस्थानांमध्ये डास अळीभक्षक गप्पीमासे सोडण्यात येतात. सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही आहे. राज्यात गप्पीमासे पैदास केंद्रांची निर्मिती केली असून योग्य डासोत्पत्ती स्थानांत मासे सोडण्यात आले आहेत.
- किटकनाशक भारीत मच्छरदाण्या :
राज्यात विविध माध्यमाव्दारे किटकनाशक भारीत मच्छरदाण्यांचे हिवताप समस्याग्रस्त भागात वाटप करण्यात आले, त्यापैकी गडचिरोली जिल्हयातील हिवताप समस्याग्र्रस्त भागामध्ये मच्छरदाण्या वाटप करण्यात आल्या.
- किटकशास्त्रीय सर्वेक्षण :
नियमित सर्वेक्षणअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत १०% घरामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येते.
(ड) मुल्यमापन व संनियत्रण :
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम योग्य रितीने राबविला जावा या करिता राज्य / जिल्हा / तालुका / प्रा.आ.केंद्र स्तरावरुन क्षेत्रीय भेटी व्दारे मुल्यमापन व संनियत्रण केले जाते.
(ई) आरोग्य शिक्षण :
हिवताप प्रतिरोध महिना जून :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जून मध्ये हिवताप प्रतिरोध महिना विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.
गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवामध्ये जनतेमध्ये किटकजन्य आजारांविषया जनजागृती करण्यात येते.
विविध उपक्रम – पदयात्रा, ग्रामसभा, प्रभातफेऱ्या, कार्यशाळा, प्रशिक्षण,विविध माध्यमाद्वारे प्रसिध्दी (वृत्तपत्रे, हस्तपत्रिका, भित्तीपत्रिका, भिंतीवरच्या म्हणी, आकाशवाणी, दूरदर्शन, केबल टि.व्ही इ.)
२). डेंगी ताप, चिकुनगुन्या प्रतिबंधात्मक उपाययोजना:
डेंगी तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना राबविण्यांत येतात.
- ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांचेमार्फत केले जाते.
- डेंगी तापाच्या निष्कर्षासाठी ताप रुग्णांचे रक्तनमुने घेऊन संशयित रुग्णांना पुर्ण गृहितोपचार दिला जातो.
- तपासणीअंती आढळून येणा-या हिवताप रुग्णांना समुळ व पुर्ण कालावधीचा उपचार दिला जातो.
- रक्तनमुने तपासणीअंती हिवताप नसल्याचे आढळल्यास, संशयित ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन एन.आय.व्ही. पुणे / राज्यातील निवडक ४३ सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविले जातात.
- एडिस एजिप्ताय डासांचे नमुनेही विषाणुंचा प्रकार ओळखण्यासाठी एन.आय.व्ही.पुणे कडे तपासणीसाठी पाठविले जातात.
- उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.
- घरातील व परिसरातील डासअळया आढळून आलेले पाण्याच्या साठयांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. कायम पाणी साठयात गप्पी मासे सोडले जातात.
- जनतेस डेंगी तापा विषयक खालील बाबींचे आरोग्य शिक्षण दिले जाते.
- पाणी साठवणूकीच्या भांडयांची झाकणे घटट् बसविणे. आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस ठरवून त्या दिवशी पाणी साठवणूकीची भांडी रिकामी करुन, घासून-पुसून पुन्हा पाणी भरण्यासाठी वापरणे.
- घरातील व परिसरातील निरुपयोगी वस्तु उदा. फुटके पिंप, टायर, भांडी, कुंडया इत्यादी वस्तुंची विल्हेवाट लावणे.
- प्रशिक्षण :-” नवीन डेंग्यू व्यवस्थापन उपचार पध्दतीत” प्रशिक्षकांचे प्रशिक्षण भीषक (फिजीशियन), बालरोग तज्ञ यांना देण्यात आले. या प्रशिक्षकांनी त्यांचे विभागातील वैद्यकिय अधिकारी व रुग्णालयीन कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे.
- राष्ट्रीय डेंग्यू दिन (१६ मे) साजरा करण्यात आला.
- डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध महिना विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.
- शालेय डेंग्यू जागृती मोहिम – माध्यमिक शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वी च्या मुलांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात माहे ऑगस्ट मध्ये शालेय डेंग्यू जागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
- डेंगी/चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी राज्यात ५० सेंटीनल सेंटर्स स्थापन केलेली आहेत.
- जे.ई. आजाराच्या निदानासाठी राज्यात ५ सेंटीनल सेंटर्स स्थापन केलेली आहेत.
3).जे.ई (मेंदूज्वर) प्रतिबंधात्मक उपाययोजना-
- राज्यात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, गडचिरोली व अमरावती मनपा तसेच मराठवाडयातील लातूर व बीड हे जिल्हे जे.ई. साठी संवेदनशील असून या जिल्हयामध्ये जे.ई. आजाराच्या प्रतिबंधासाठी दरवर्षी नियमित लसीकरण मोहिम राबविण्यात येते.
- आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी, जलद ताप सर्वेक्षण, ताप रुग्णांचे रक्तनमुने घेवून सर्व रुग्णांना हिवतापाचा गृहितोपचार देणे.
- रक्तनमुने तपासणी अंती हिवताप नसल्याचे आढळल्यास, संशयित जे.ई ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन एन.आय.व्ही व निवडक सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
- किटकशास्त्रीय सर्वेक्षण.
- उद्रेकग्रस्त परीसरात धुरफवारणी.
- परिसर स्वच्छते विषयी जनतेस आरोग्य शिक्षण व डुकरांच्या संख्येवर नियंत्रण.
- नैसर्गिक डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेणे, व डासोत्पत्ती स्थानात डासअळीभक्षक गप्पी मासे सोडणे.
4) राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमार्तंगत उपाय योजना :-
- सर्वक्षणाव्दारे हत्तीरोग नियंत्रण पथक, हत्तीरोग सर्वेक्षण पथक व रात्रचिकीत्सालय यांच्या मार्फत रात्रीच्या वेळी सर्वक्षणाव्दारे लोकसंख्येच्या १० टक्के रक्त नमुना गोळा केले जातात व दुषित हत्तीरोग रुग्णांना त्वरीत औषधोपचार करण्यात येतो.
- डासोत्पत्ती स्थानांची गणना करुन दर आठवडयास डासोत्पत्ती स्थानावर अळीनाशकाची फवारणी करणे.
- किटकशास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत नियमितपणे डास व डासअळी घनतेची पाहणी करणे, तसेच डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे.
- हत्तीरोग रुग्णासाठी मॉर्बिडिटी क्लिनीक सुरु करणे.
- किरकोळ अभियांत्रिकी पध्दतीने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे / कमी करणे.
- जनतेस हत्तीरोगाविषयी आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करणे.
- आढळून आलेल्या पात्र अंडवृध्दी हत्तीरोग रुग्णांची शस्त्रक्रिया करणे, दर सहा महिन्यानी पाठपुरावा (फॉलोअप) घेणे.
5) प्लेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खालील कार्य केले जाते.:-
- नियमित प्लेग सर्वेक्षणात गावांमधील घरातील व शेतातील उंदीर पकडून त्यावरील पिसवा गोळा करणे .
- उंदीर घनता व पिसवा निर्देशांक तपासणे.
- पकडलेल्या उंदरांचे विच्छेदन करुन त्यांचे अवयव व रक्तजल नमुने घेणे.
- याशिवाय गावातील कुत्र्यांचे रक्तजल नमुने गोळा करणे.
- सदरहू गोळा केलेले सर्व अवयव नमुने, रक्तजल नमुने तसेच पिसवा एन् .आय् . सी. डी. बेंगलोर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतात.
- पिसवा निर्देशांक १ पेक्षा जास्त आढळून आलेल्या गावातील उंदरांचे बिळात व त्या ठिकाणाभेवती किटकनाशकाची धुरळणी करण्यात येते.
उपरोक्तप्रमाणे नियमित सर्वेक्षणकार्य व उपाय योजनांची अंमलबजावणी काळजीपूर्वक करण्यांत आल्याने सन १९९५ पासून राज्यात प्लेग रुग्ण अथवा उंदिर मरुन पडल्याची एकही घटना आढळली नाही.
लाभार्थी:
नागरीक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाईन