नियमित लसीकरण कार्यक्रम
प्रस्तावना –
- बालमृत्यू व बालकांमधील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे योग्य वयात संपूर्ण लसीकरण करणे ही अत्यंत सोपी, कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे.
- बालकांमधील क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफीलस इन्फ्लुएन्झा टाईप बी, पोलिओ, गोवर व रुबेला या आजारांमुळे होणारे आजारपण व मृत्यू कमी करणे हे नियमित लसीकरण कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.
- सदर कार्यक्रमांतर्गत बीसीजी लस क्षयरोगाकरीता, डीपीटी लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला या आजारांकरिता, पोलिओ लस पोलिओ आजाराकरिता, गोवर- रुबेला लस गोवर व रुबेला आजाराकरिता, हिपॅटायटिस बी लस काविळ आजाराकरिता व पेंटाव्हॅलंट लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफीलस इन्फ्लुएन्झा टाईप बी व काविळ या आजारांकरिता प्रतिबंधात्मक साधन म्हणून उपयोगात आणल्या जातात.
- लसीकरण कार्यक्रमासाठीचे अनुदान केंदशासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत प्राप्त होते. कार्यक्रम अंमलबजावणीसाठी आवश्यक लसी व एडी सीरिनजेस यांचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जातो.
- सर्व आरोग्य संस्थांमध्ये तसेच बाह्यसंपर्क कार्यक्षेत्रात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते व समान लसी दिल्या जातात. लसींची क्षमता टिकून राहण्यासाठी लसीची वाहतूक शीतसाखळी अबाधित ठेवून करण्यात येते
- जापनिज एन्सेफेलायटिस लस ही जापनिज एन्सेफेलायटिस या आजाराच्या प्रतिबंधाकरिता अमरावती (मनपासह), यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली, लातूर, बीड ,वर्धा,उस्मानाबाद ,सोलापूर, आणि चंद्रपूर या जिल्हयात देण्यात येते.
उद्दिष्ट-
- लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या आजाराने होणाऱ्या बाल मृत्युचे व आजाराचे प्रमाण लसीकरणाने कमी करणे.
- बालकांचे योग्य वयात लसीकरण पूर्ण करणे.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था –
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि निमशासकीय संस्था यांचे मार्फत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते.
मनुष्यवळ –
नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत सेवा प्रशिक्षित वैद्यकिय व अवैद्यकिय अधिकारी व कर्मचारी तसेच शीतसाखळी तंत्रज्ञ यांच्यामार्फत देण्यात येते. कार्यक्रमाची अंमलबजावणी परिणामकारक व सुलभतेने होण्याकरिता वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी / आरोग्य सेविका, तसेच आशा कार्यकर्ती यांना नियमितपणे प्रशिक्षण देण्यात येते.
पेंटाव्हॅलेन्ट लस –
राज्यात राष्ट्रीय नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत पेंटाव्हॅलेन्ट लसीचा समावेश दि २२ नोव्हेंबर, २०१५ रोजी करण्यात आला आहे. या लसीमुळे घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफीलस इन्फ्लुएन्झा टाईप बी व कावीळ या ५ आजारांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना प्रतिबंध होणार आहे.
रोटा व्हायरस लस –
रोटा व्हायरस अतिशय संक्रमनजन्य व्हायरस असून संक्रमण झाल्यास लहान बालकामध्ये अतिसार होतो व अतिसारामुळे शरीरामधील पाणी व मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते व त्यामुळे बालके गंभीर आजारी किंवा मृत्युमुखी पडतात. रोटा व्हायरस लस दिल्यामुळे बालकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते व अतिसारामुळे होणाऱ्या मृत्युमध्ये घट होऊ शकते.
रोटा व्हायरस ही लस वयाच्या सहाव्या, दहाव्या व चौदाव्या आठवडयामध्ये तोंडावाटे देण्यात येते.
टीडी-Td –
धनुर्वात प्रतिबंधक लस (टीटी) ऐवजी धनुर्वात व घटसर्प (टीडी) लस यापुढे सर्व गर्भवती महिला तसेच, १० वर्षे आणि १६ वर्षे वयोगटातल्या मुलांना देण्यात येते.
न्यूमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सिन (PCV) –
मुलांना न्यूमोकोकल आजारांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता सार्वत्रिक लसीकरण मोहिमे मध्ये न्यूमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सिन (PCV ) लसीचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात माहे जुलै २०२१ पासून ही लस देण्यास सुरुवात झाली आहे.
लसीकरणासाठी येणाऱ्या ६ व्या आठवडयाच्या बाळांना PCV चा पहिला डोस दिला जातो दूसरा डोस वयाच्या १४ व्या आठवडयात दिला जातो व वयाची नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला बुस्टर डोस देण्यात येतो.
गोवर व रुबेला लसीकरण मोहिम–
गोबर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. गोवर व रुबेला लस ही गोवर आणि रुबेला हया दोन्ही आजारांवर अत्यंत उपयुक्त व प्रभावी लस आहे .गोवर व रुबेला लस ०९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येते.
गोवर व रुबेला लसीकरणाची मोहिम प्रामुख्याने आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभागया विभागामार्फत राबविण्यात आली आहे. तसेच, नगरविकास विभाग, आदिवासी विनास विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग व अल्पसंख्यांक विभाग यांच्यसहभागाने ही मोहिम राबविण्यात आली आहे.
सदर मोहिमेसाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ (UNICEF), इंडियन अॅकडमी ऑफ पेडियंट्रीक (IAP), इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA), रोटरी क्लब, लायन्स क्लब इ. चे सहकार्य लाभले आहे ICICI बँकेतर्फे सीएसआर (CSR) मधून प्रसिध्दी साहित्यासाठी निधी प्राप्त झाला आहे.
पोलियो निर्मूलन कार्यक्रम-
- पोलियो रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यांत येत आहे.
- या मोहीमेमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा पूर्वी झालेले लसीकरण विचारात न घेता देण्यात येते.
- ग्लोबल कमिशन फॉर द सर्टिफिकेशन ऑफ पोलिओमायलीटीस ईरेंडीकेशन, यांनी दिनांक २० सप्टेंबर २०१५ रोजी जग पोलिओ व्हायरस वाईल्ड टाईप २ पासून मुक्त झाल्याचे प्रमाणित केले आहे.
- दि. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या पोलिओ ईरॅडीकेशन अॅन्ड एंडगेम स्ट्रॅटेजी प्लॅन (२०१३-१८) नुसार संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यामध्ये खालील बाबीचा समावेष आहे.
- OPV चा समावेष असलेली शेवटची पल्स पोलिओ मोहिम दि. १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी २०१६ दरम्यान राबविण्यात आली आहे.
- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दिनांक २५ एप्रिल, २०१६ पासून नियमित लसीकरणामध्ये देण्यात येणारी OPV लस बंद करण्यात आली असून BOPV लस सुरु करण्यात आली आहे
- दि. २५ एप्रिल २०१६ पासून राज्यामध्ये आयपीव्ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली असून सदर लसीचे इंजेक्शन एक वर्षाखालील मुलांना पोलिओच्या पहिल्या व तिसऱ्या डोसच्या वेळी देण्यात येत आहे.
दि. १० मार्च २०१९ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली
लाभार्थी:
नागरीक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन